नवकोटी लेकरांची माय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली ॥धृ॥
साहेब परदेशी, रमा उपवाशी
संसाराचा भार शिरी दरदिवशी
वाघाच्या जोडीला गाय पाहिली
वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली ॥१॥
कष्टानं बाई तिनं नटविला संसार
विकुनिया गवऱ्या लावी हातभार
तिच्या ठायी संसाराची घाय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली ॥२॥
ज्ञानसागराला ज्ञानाची भरती
शिकविले साहेबाला केली इच्छापूर्ती
कधी न मुखावर तिच्या हाय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली ॥३॥
आभाळाचा पदर, आभाळाची छाया
आहे जगात अशी रमाईची माया
अशी न कुणाची कधी माय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली ॥४॥
नवकोटी लेकरांची माय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली
0 Comments